एसटी महामंडळाचे दुर्लक्ष; सोयीसुविधा देण्याची प्रवशांची मागणी
| चिरनेर | वार्ताहर |
पनवेल एसटी बसस्थानकात अनेक गैरसोयी भेडसावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आगारातील शौचालये, मुताऱ्यांची दुरवस्था झाली असून, प्रवाशांबरोबर कर्मचाऱ्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. गाड्या नादुरस्त होणे, गाड्यांची अस्वच्छता, वाहक, चालक तंत्रज्ञांची कमतरता, गाड्यांचा तुटवडा अशा अनेकानेक समस्यांच्या विळख्यात पनवेल आगार अडकले आहे. परंतु, व्यवस्थापनाचे या सर्व बाबींकडे दुर्लक्ष झाले असून, त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे.
पनवेल हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे एसटी बसस्थानक आहे. या बसस्थानकातून मुंबई, ठाणे, कल्याण, मुंब्रा, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अलिबाग, मुरुड, रत्नागिरी, श्रीवर्धन, माणगाव, दिवेआगर, खोपोली, कर्जत, उरण, चिरनेर तसेच निरनिराळ्या भागात एसटीच्या गाड्या प्रवास करतात. त्यामुळे प्रवाशांची सतत गर्दी असते. मात्र, पनवेल एसटी बस स्थानक नव्याने उभारण्यासाठी गेल्या काही वर्षांपूर्वी हे बसस्थानक पाडले असून, ते अजून उभारले गेले नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
चिरनेरमार्गे केळवणे गावाकडे जाणारी संध्याकाळची सहा दहाची बस आणि संध्याकाळच्या इतर गाड्या वेळेवर लागत नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. परिणामी, चिरनेर मार्गे आवरे, केळवणे या गावांकडे जाणाऱ्या एसटीच्या गाड्यांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून सातत्याने केली जात आहे. या बसस्थानकातून अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करणे, गाड्या नादुरुस्त होणे, गाड्या अस्वच्छ असणे, वाहक चालक तंत्रज्ञांची कमतरता भासणे, एसटी गाड्यांचा तुटवडा असणे, असे प्रकार सतत घडत आहेत. या बाबतीत प्रवाशांनी पनवेल एसटी आगाराच्या व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रारीदेखील केल्या आहेत. मुताऱ्या, शौचालये यांची झालेली दुरवस्था यामुळे प्रवाशांबरोबर कर्मचाऱ्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांना लघवीसाठी मुतारीत जाण्यासाठी पाच रुपये द्यावे लागत आहेत. तर काही प्रवासी तिथे असलेल्या पत्र्यांचा आडोसा घेऊन उघड्यावरच लघवी करत आहेत. त्यामुळे बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या एसटी बस स्थानकाच्या बाजूला खोदकाम चालू असून, या खोदकामाचा सगळा चिखल ज्या ठिकाणी गाड्या लागतात, त्या ठिकाणी येत असल्यामुळे प्रवाशांना चिखलातून बसमध्ये चढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डे टाळण्यासाठी होत असलेल्या कसरतीत येथे अनेक वेळा गंभीर प्रसंग निर्माण होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, महिला व सर्वसामान्य प्रवाशांत एसटी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. या बस स्थानकात पडलेले खड्डे, निवारा शेडची दुरवस्था सार्वजनिक स्वच्छता, शौचालये व मुतारींची झालेली दुरवस्था याकडे बघण्यास येथील अधिकारी व जबाबदार लोकप्रतिनिधींना वेळ मिळत नसेल, तर या समस्या कशा सुटतील, असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे.
संबंधित एसटी प्रशासनाने बस स्थानकातील गैरसोयी दूर कराव्यात. त्याचबरोबर चिरनेर मार्गाकडे जाणाऱ्या एसटी गाड्यांच्या संख्येत वाढ करावी. यासंदर्भात आगारप्रमुख श्री. म्हात्रे यांच्याकडे महिनाभरापूर्वीच अर्ज केला आहे.
जयवंती गोंधळी, अध्यक्षा, मातृछाया संस्था
अधिकाऱ्यांची अरेरावी
एसटी प्रशासनाकडून डेपोत गाड्या कमी असल्याचे कारण सांगितले जात आहे. तसेच आगारात कर्मचारी वर्गही कमी असल्याची वस्तुस्थिती सांगितली जात आहे. चौकशी करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना उडवाउडवीची व उद्धट उत्तरे दिली जात आहेत. या त्रासाला प्रवासी कंटाळले आहेत.