भारताच्या लक्ष्य, प्रणॉयची आगेकूच
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतासाठी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मंगळवारचा दिवस संमिश्र यशाचा ठरला. एकीकडे लक्ष्य सेन व एच.एस.प्रणॉय या खेळाडूंनी पुरुषांच्या एकेरीत आगेकूच केली असतानाच ऑलिंपिक पदकविजेती पी.व्ही.सिंधू हिला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील तिचे आव्हान संपुष्टात आले. या स्पर्धेमध्ये लक्ष्य याला 11वे मानांकन देण्यात आले आहे. तसेच 2021मध्ये त्याने या स्पर्धेत ब्राँझपदकाला गवसणी घातली होती. त्याच्यासमोर 51व्या स्थानावरील कोरियाच्या जिऑन जिन याचे आव्हान होते. भारताच्या पठ्ठ्याने कोरियन खेळाडूवर 21-11, 21-12 असा सहज विजय संपादन केला. लक्ष्यने 36व्या मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात केली हे विशेष.
प्रणॉय याने चिको वारदोयो याच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय साकारत पुढे पाऊल टाकले. प्रणॉयने पहिला गेम 21-9 असा खिशात टाकला. पहिल्या गेममध्ये प्रणॉयने अप्रतिम खेळ करीत आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्ध्याकडून थोडीफार झुंज मिळाली. पण प्रणॉयने आपले वर्चस्व कायम राखले. भारताच्या अनुभवी खेळाडूने 21-14 असे या गेममध्ये यश मिळवले आणि घोडदौड केली.
भारताला दुहेरी विभागात निराशेला सामोरे जावे लागले. व्यंकट प्रसाद- जुही देवानगन तसेच अश्विनी भट -शिखा गौतम या जोड्यांचा पराभव झाला. यामुळे दोन्ही जोड्यांना स्पर्धेमधून बाहेर जाण्याच्या नामुष्कीचा सामना करावा लागला.
सिंधून संधी गमावली
नोझोमी ओकुहरा हिने पी. व्ही. सिंधूचे आव्हान 21-14, 21-14 असे संपुष्टात आणले. सिंधूचा 44 मिनिटांमध्ये पराभव झाला. पहिल्या गेममध्ये 6-6 अशी बरोबरीनंतर ओकुहरा हिने त्यानंतर 16-12 व 19-12 असे पुढे जात पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सलग 9 गुण मिळवत झोकात पुनरागमन केले. पण तिने ही संधी वाया घालवली. ओकुहरा हिने सहा गुणांची कमाई करीत गेमला कलाटणी दिली.