| रायगड | खास प्रतिनिधी |
गेल्या महिन्यात जिल्ह्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. नऊ हजार 854 हेक्टरवरील भात पीकासह नागली पीक नष्ट झाले आहे. तब्बल 24 हजार 77 शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आठ कोटी 47 लाख 14 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळावी असा प्रस्ताव कृषी विभागाने सरकारकडे पाठवला आहे. सरकारच्या मंजुरीनंतर नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कृषी अधिक्षक उज्वला बाणखेले यांनी सांगितले.
जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाला. त्यामुळे शेतींच्या कामांना उशिराने सुरुवात झाली होती. त्यानंतर पावसाने जुलै महिन्यात जोरदार बॅटींग केली. अतिवृष्टीमुळे शेतात काही प्रमाणात उभे राहिलेले पिक आडवे झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसल्याचे पंचनाम्यातून समोर आले होते. पाच हजार 942.14 हेक्टरवरील पीक नष्ट झाले. या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या 11 हजार 823 इतकी आहे. या कालावधीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. सरकारकडे नुकसान भरपाईच्या निधीची मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत कोकण आयुक्तांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यानंतर तो सरकारकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर निधी प्राप्त झाल्यावर तो संबंधीत शेतकऱ्यांना देण्यात येण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.