| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये जंगल भागात घोड्याला काही आजार झाल्यास त्या ठिकाणी सेवा देण्याचे काम शासनाचा पशु वैद्यकीय विभाग करीत असतो. येथील इंदिरा गांधी नगर परिसरात म्हणजे माथेरान गावाच्या अगदी एका बाजूला हा पशु वैद्यकीय दवाखाना उभारला आहे. मात्र हा दवाखाना कोणत्या भागात आहे हे महत्वाचे नसते तर माथेरान मधील घोडा, माकड असा मुक्या प्राण्यांना काही आजार झाल्यास जागेवर जाऊन येथील पशु वैद्यकीय अधिकारी या मुक्या प्राण्यांवर उपचार करण्याचे काम केले आहे.
काही दिवसापूर्वी माथेरानमध्ये विष बाधा झाल्याने माकडे बेशुद्ध पडली होती. त्यावेळी माथेरान मधील पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल चव्हाण यांनी माकडांना ठेवलेल्या जागेवर जाऊन त्यांच्यावर उपचार केले होते. तर माथेरानमधील शिंगाडे या अश्वपालक यांचा घोडा दस्तुरी येथील वाहनतळ मध्ये विचित्र वागू लागला होता. त्याबाबत अश्वपालकाने त्या घोड्याला काय होतेय याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि घोड्याच्या अंगावर हाताने मॉलिश करण्याचे काम केले. मात्र घोड्याची स्थिती बिघडत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने वाहनतळ येथेच घोड्याला बांधले. तेथे पशु वैद्यकीय अधिकारी दस्तुरी वाहनतळ येथे पोहचले आणि त्यांनी त्याच ठिकाणी घोड्याची तपासणी केली. त्यावेळी घोड्याच्या पोटात अपचन झाल्याने दुखत असल्याचे डॉ. चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आधी त्या घोड्याला इंजेक्शन दिले आणि नंतर सलाईन देखील लावले. मात्र हे सर्व उपचार त्या घोड्यावर येथील पशु वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या पशु वैद्यकीय दवाखान्यात नेवून केले नाहीत तर दस्तुरी येथील वाहनतळाला घोड्याला बांधून केले. त्या ठिकाणी पशुधन दवाखाना मधील कर्मचारी हे हातात सलाईन पकडून उपचार करण्यात अग्रभागी होते. मुक्या प्राण्यांवर ऑन दि स्पॉट उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कार्याबद्दल कौतुक होत आहे.