रायगडात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार कमी; सत्तरी ओलांडणारे एक लाख 16 हजार 647 महिला मतदार
|रायगड | प्रतिनिधी |
प्रशासक कारभाराची दोन वर्षे अनुभवणाऱ्या रायगड जिल्ह्यातील मतदारांसह लोकप्रतिनिधींनादेखील निवडणुकांचे वेध लागले आहेत. जिल्ह्यातील सात विधानसभा क्षेत्रात पुरुष मतदार 11 लाख 70 हजार 822 तर महिला मतदारांची संख्या 11 लाख 25 हजार 412 इतकी आहे. जिल्ह्यातील पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या 45 हजार 410 इतकी कमी आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आपले नवे लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी हेच मतदार मतदान करणार आहेत. पुरुष मतदारांवर उमेदवारांची मदार असणार आहे. 18 ते 59 वयोगटात पुरुष मतदार अधिक असून, ज्येष्ठ मतदारांमध्ये महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
मतदार यादीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रायगड जिल्हा निवडणूक शाखेने तालुका निवडणूक विभाग आणि विधानसभानिहाय मतदारयाद्या तपासण्याचे काम हाती घेतले आहे. असणाऱ्या मतदारयाद्यांमध्ये दिलेल्या पत्त्यावर मतदार आढळून न आल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाला असल्यास त्यांची नावे यादीतून वगळली जाणार आहेत. एक वर्षानंतर राज्यात प्रथम लोकसभा व नंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका निवडणुकाही होणे अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहेत.
रायगड जिल्ह्यात 11 लाख 25 हजार 412 महिला मतदारांची संख्या आहे. यामध्ये 18-19 वयातील 111 हजार 329 मतदार, 20-29 वयामधील दोन लाख 2 हजार 153 मतदार, 30 ते 39 वयामधील दोन लाख 63 हजार 784 मतदार, 40-49 वयामधील दोन लाख 25 हजार 537 मतदार, 50-59 वयामधील एक लाख 81 हजार 2 मतदार, 60-69 मधील एक लाख 24 हजार 960, 70-79 मधील 72 हजार 208, 80 ते 89 मधील 34 हजार 217, 90 ते 99 मधील नऊ हजार 430, 100 ते 109 मधील 790 मतदार आणि 110 ते 119 वयामधील दोन महिला मतदारांचा समावेश आहे.
शंभरी ओलांडणारे मतदार
रायगड जिल्ह्यात वयाची शंभरी ओलांडणारे 1 हजार 322 मतदार असल्याचे मतदारयाद्यांवरून स्पष्ट झाले आहे. यामध्ये 792 महिला मतदारांचा समावेश आहे. यामध्ये पनवेल विधानसभा क्षेत्रात 110 मतदार, कर्जत विधानसभा क्षेत्रात 395 मतदार, उरण विधानसभा क्षेत्रात 121 मतदार, पेण विधानसभा क्षेत्रात 230 मतदार, अलिबाग विधानसभा क्षेत्रात 162 मतदार, श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रात 73 मतदार आणि महाड विधानसभा क्षेत्रातील 231 मतदारांचा समावेश आहे.