मोदींना पत्र लिहून सोनियांनी केली विचारणा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं असून त्यासंबंधी आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका मागितली आहे. कोणतीही चर्चा न करता विशेष अधिवेशन का जाहीर करण्यात आले, असा त्यांचा सवाल आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका आधी जारी केली जाते. तसे न करण्याची ही पहिलीच वेळ असून ही दुर्दैवी बाब आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.
मंगळवारी सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक झाली आणि त्यानंतर इंडिया आघाडीच्या पक्षांच्या खासदारांसोबत बैठक झाली. अधिवेशनात विरोधक कोणते मुद्दे उपस्थित करणार आहेत, याबाबत बैठकीत चर्चा झाली. विरोधी पक्ष संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये सभागृहावर बहिष्कार घालणार नसून जनतेचे प्रश्न मांडणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सोनिया गांधी यांनी विशेष अधिवेशनात पक्षाला कोणते मुद्दे मांडायचे आहेत याचाही उल्लेख केला आहे. विरोधकांनी मांडलेल्या या मुद्द्यांवर चर्चा व्हावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे.
या मुद्द्यांवर चर्चा हवी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांची एमएसपीची मागणी, अदानी समुहावरील आरोप व त्यांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी, तसेच जात जनगणना, चिनी घुसखोरी, हरियाणातील दंगल आदी मुद्द्यावर चर्चा करण्याचा विरोधकांचा आग्रह राहील.