। श्रीवर्धन । वार्ताहर ।
अजित पवारांचा गट आमदारांसह भाजपा, शिवसेना सरकार मध्ये सामील झाला आहे. विशेष करून खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे हे देखील या सरकारमध्ये सहभागी आहेत. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजामध्ये तटकरे कुटुंबीयांबद्दल प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे.
नुकतीच श्रीवर्धन मध्ये (शिवसेना) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भव्यरॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये अल्पसंख्यांक समाजाचा खूप मोठ्या प्रमाणावरती सहभाग होता. श्रीवर्धन तालुका त्याचप्रमाणे म्हसळा तालुका या ठिकाणचे अनेक युवक व अल्पसंख्यांक समाजाचे नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.आदिती तटकरे या भाजपा, शिवसेना सरकारमध्ये मंत्री झाल्या त्याबद्दल अल्पसंख्यांक समाजामध्ये नाराजी असल्याचे उघड उघड बोलले जात आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना नक्कीच मतदान करणार नाही, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस मधील एका गटाने हिंदुत्ववादी सरकारमध्ये सामील झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर असल्याचे दिसून येते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांचा या रॅलीमध्ये महत्त्वाचा सहभाग होता. कारण त्यांना आमदारकीचे तिकीट या पक्षाकडून जाहीर झाले आहे. त्यामुळे त्यांनी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ही रॅली काढली असे देखील बोलले जात होते. आगामी होणाऱ्या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राज्यात सत्तेमध्ये असलेली भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस युती मोठ्या प्रमाणात यशस्वी होते का? हे पाहावे लागेल. तर पुढील होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तटकरे कुटुंबीय किती प्रमाणात यशस्वी होतात हे सुद्धा पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.