। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगडच्या वादग्रस्त जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची मुंबईतील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी करण्यात आलेली नियुक्ती रद्दबातल करीत नव्याने त्यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली आहे.
निधी चौधरी यांची रायगडच्या जिल्हाधिकारीपदावरुन नुकतीच उचलबांगडी करुन त्यांच्या जागी नव्याने कामगार आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आज शासनाने पुन्हा एकदा यात बदल करीत नव्याने मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदी निधी चौधरी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश काढले आहेत. या पदावर असलेले मिलिंद बोरीकर यांची बदली करत पर्यटन विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची महाराष्ट्र पर्यटन विभाग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, डॉ निरुपमा डांगे यांची नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनच्या सहायक निवासी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.