वासराला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील कोलाड-खांब येथील महादेव तुकाराम सुतार यांच्या गायीने चक्क सात पाय असेलेल्या वासरला जन्म दिला आहे. अजब वासराला पाहण्यासाठी मुठवी (बु.) गावामध्ये गर्दी उसळली आहे. महादेव सुतार हे शेती बरोबरच शेती पूरक व्यवसाय करतात. ते पशुपालनदेखील करतात. त्यांच्याकडे असलेल्या गायीने एका शनिवारी सकाळी वासराला जन्म दिला. वासराला सात पाय असल्याची बाब सुतार यांच्या लक्षात आली. वासराची आणि गायीची प्रकृती ठणठणीत आहे. या वासराला अन्य वासरांप्रमाणे चार पाय आहेत. तर वासराच्या मानेच्या कण्यावर दोन बाजूला दोन पाय तर त्याला जोडूनच एका पायाला जोड पाय आहेत. हे अजब वासरु पाहण्यासाठी नागरिक मोठ्याप्रमाणात गर्दी करत आहेत.