16-1 ने केला दारुण पराभव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. सोमावारी भारतीय महिला क्रिकेट संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले असून, मंगळवारी भारतीय हॉकी संघाने साखळी सामन्यात सिंगापूरचा दारुण पराभव केला. भारताने सिंगापूरचा 16-1 च्या फरकाने पराभव केला. भारताने पहिल्या मिनिटांपासूनच सामन्यावर पकड मजबूत ठेवली होती. भारताने पहिल्या सत्रामध्ये 1 गोल करत दमदार सुरुवात केली. त्यानंतर एकापाठोपाठ एक गोल करत खेळाडूंनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. कर्णधार हरमनप्रीत सिंहने 4 गोल केले. तर मनदीप सिंहने गोलची हॅट्ट्रिक नोंदवली.
याआधीच्या साखळी सामन्यातही भारतीय संघाचे निर्वादित वर्चस्व राहिले होते. भारतीय हॉकी संघाने उज्बेकिस्तानचा 16-0 च्या फरकाने दारुण पराभव केला होता. आज सिंगापूरला अस्मान दाखवत भारताने बाजी मारली आहे. मनदीप सिंह याने 13व्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल साधला. या गोलच्या बळावर पहिल्या सत्राअखेर भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला 16व्या मिनिटाला ललित कुमारने भारतासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर 22 व्या मिनिटांला गुजरंत याने तिसरा आणि 23 व्या मिनिटाला विवेक सागर प्रसादने चौथा गोल केला. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंह याने स्ट्राइक केले आणि भारताच्या खात्यात पाचवा गोल डागला. मनदीप सिंगने 29व्या मिनिटाला आपला दुसरा आणि संघाचा सहावा गोल केला. अशा प्रकारे भारताने पहिल्या सत्रामध्ये 6-0 अशी आघाडी मिळवली.
दुसऱ्या सत्रामध्ये भारतीय खेळाडूंनी आपला खेळ आणखी उंचावला. दुसरा हाफ सुरु झाल्यानंतर लगेच 37 व्या मिनिटाला मनदीप सिंह याने टीमसाठी सातवा गोल केला. त्यानंतर 38 व्या मिनिटाला शमशेर सिंह याने आठा गोल केला. त्यानंतर 40व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरद्वारे दोन गोल केले. अशा पद्धतीने भारताने दुसऱ्या सत्राची सुरुवात दणक्यात केली. भारताची आघाडी 10-0 अशी झाली होती. 42व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने आणखी एक पेनल्टी कॉर्नर घेत 11वा गोल केला अन् भारताची आघाडी 11-0 अशी केली. मनदीप सिंहने 51व्या मिनिटाला दोन गोल केले तर अभिषेकनेही 51व्या आणि 52व्या मिनिटाला दोन गोल डागले. यानंतर 53व्या मिनिटाला सिंगापूरच्या झकी जुल्करनैनने संघासाठी पहिला आणि शेवटचा गोल केला. त्यानंतर अवघ्या 2 मिनिटांनंतर भारताच्या वरुण कुमारने 55 व्या मिनिटाला सलग दोन गोल करत भारताला 16-1 ने आघाडीवर नेले.