अमित शाहांच्या हस्ते होणार उद्घाटन
| पुणे | प्रतिनिधी |
66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन यंदा पुण्याच्या वाघोलीतील लोणीकंद फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कुलच्या मैदानावर आयोजित कऱण्यात येणार आहे. दि. 1 ते 7 नोव्हेंबरदरम्यान हे सामने खेळवले जातील. या स्पर्धेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिली. यंदाच्या केसरी स्पर्धेत 47 संघांतील 900 हून अधिक मल्ल होणार सहभागी होणार आहेत.
रामदास तडस यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही स्पर्धेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण पाठवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तसाच वेळ मागितला असल्याची माहिती खासदार तडस यांनी दिली. तारीख अजून मिळाली नसल्याने कुस्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांना कळवले नसल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपांत्य फेरीच्या लढतीत पंचाच्या निर्णयावर काहींनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. ज्यानंतर हा वाद पूर्ण महाराष्ट्रभर पेटला होता. ही लढत गंगावेश तालमीतील सिंकदर शेख आणि सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांच्या खेळवण्यात आली होती. यामध्ये महेंद्र गायकवाड याने सिंकदरवर ‘बाहेरची टांग’ डाव टाकला. यावर पंचांनी महेंद्रला गुण दिले होते. सिंकदरला ही लढत गमवावी लागली होती. त्यानंतर पुण्याच्या शिवराज राक्षे आणि सोलापुरच्या महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम लढत खेळवण्यात आली. ज्यात शिवराजने महेंद्रवर विजय मिळवला.