| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड पोलीस ठाण्यात 2015 साली कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुदेश पालकर यांना पोलीस ठाण्यात लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर ही केस अलिबाग सत्र न्यायालयात सुरू होती. आज आठ वर्षांनी न्यायालयाने सुदेश पालकर यांची या आरोपामधून निर्दोष मुक्तता केली आहे. सविस्तर वृत्त असे आहे की ,मुरुड तालुक्यात घरफोडयांचे सत्र जोरात सुरू होते. विहूर पेट्रोल पंप चोरी प्रकरण व मजगांव येथील मोबाईल दुकान लुटल्याच्या घटनेची जिल्हा पोलीस कार्यालयाकडून दखल घेण्यात आली.
या दोन्ही प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी तत्कालीन मुरुड पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक सुदेश पालकर यांना देण्यात आली होती. घरफोड्या करणाऱ्या टोळीचा शोध घेत होते. टोळीपर्यंत पोहोचलेही होते. पण काही नतदृष्टांनी चुकीचे सल्ले देऊन सुदेश पालकर यांना अटकविण्याचा बेत ठरविला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यावेळी लाच घेतल्याचे भासविण्यात आले. त्याचवेळी त्यांना अटक करण्यात आली. सदर खटल्याचा निकाल अलिबाग सत्र न्यायालयाने आठ वर्षांनी दि.26 सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक सुदेश पालकर यांच्या बाजूने देत त्यांना सर्व आरोपातून दोषमुक्त केले. मुरुडकर जनतेनेहीसुद्धा समाधान व्यक्त केले आहे. पालकर यांच्यातर्फे ॲड. अंकित बंगेरा यांनी काम पाहिले.