| सोगांव | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चोंढी विभागातील महावितरणचे कर्मचारी मुकुंदराज चाटे हे मुनवली येथे वीज खांबावर चढून काम करीत असता खाली पडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.1) घडली.
मुकुंदराज चाटे हे मुळचे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई गावचे राहणारे होते. सध्या ते नोकरीनिमित्त चोंढी येथे असल्याने शिवनगर, गोंधळपाडा येथे राहत होते. ही घटना घडल्यानंतर याबाबतची फिर्याद सोगावचे इलियास हसनमियाँ हाफिज यांनी अलिबाग पोलिसांना दिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास मुनवली येथील पिंट्या नागावकर यांच्या गॅरेजसमोर असलेल्या विद्युत खांबावर महावितरणचे कर्मचारी मुकुंदराज भगवान चाटे हे दुरुस्तीच्या कामासाठी चढले होते. यावेळी विद्युत पोलवर काम करीत असताना अचानक ते खांबावरून खाली पडले. त्यांना बेशुद्ध अवस्थेत मुनवली ग्रामस्थांनी खासगी वाहनाने अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव पिंट्या गायकवाड मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेमधून अंबेजोगाई, बीड येथे त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यासाठी रवाना करण्यात आले. याबाबतचा अधिक तपास अलिबाग पोलीस करीत आहेत. त्यांच्या या निधनाने ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली असून चाटे यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, आई असा परिवार आहे. महावितरण प्रशासनाने त्यांच्या कुटुंबियांना त्वरित योग्य ती भरपाई देत त्यांच्या पत्नीला कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पिंट्या गायकवाड यांनी महावितरण प्रशासनाकडे केली आहे.