तात्काळ डागडुजी करण्याची मागणी
| आपटा | वार्ताहर |
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या पाताळगंगा नदीवरील जुन्या पुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या पुलाची तात्काळ डागडुजी करून लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी रसायनी पंचक्रोशीतील नागरिक आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून या पुलाची अत्यंत दयनीय व बिकट अवस्था झाली असल्याने नागरिक व प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सन 1984 साली ह्या पुलाची उभारणी करण्यात आली असून, जवळपास 39 वर्षे या पुलाला होत आहेत. रायगड जिल्ह्यातील रसायनी-पाताळगंगा हा सर्वात मोठा औद्योगिक परिसर आहे. अनेक नामवंत छोटे-मोठे कारखाने या औद्योगिक क्षेत्रात असल्याने रहदारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राबरोबरच बाजूला पनवेल तालुक्यातील चावणे परिसरात काही वर्षांपूर्वीच अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र निर्माण झाल्याने या क्षेत्रात मुंबई, नवी मुंबई, ठाणे अन्य परिसरातून कामगार मोठ्या प्रमाणात ये-जा करत असत असल्याने या परिसराला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे.
एकीकडे औद्योगिकीकरण, नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असताना रहदारीची समस्याही तितकीच वाढली आहे. या जुन्या पुलाला लागूनच पर्यायी पूल काही वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याने जुन्या पुलाकडे संबंधित प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. सध्या नवीन पुलावरूनच वाहतूक सुरू असल्याने या सकाळी व संध्याकाळी पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. कामगारांच्या बसेस, स्कूल बसेस,ऑटो रिक्षा, खासगी वाहनांसह मोठमोठे कंटेनरची रहदारी याच नव्याने उभारण्यात आलेल्या पुलावरून होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न सामान्य नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना आणि वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. वाहतूक कोंडीचा तिढा कायमचा सुटण्यासाठी जुन्या पुलाची सुस्थितीत त्वरित डागडुजी करून हा पूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सन 2010-11 साली एका ट्रकने पुलाच्या कठड्यावर धडक दिल्याने हा पूल थोडासा कमजोर झाला होता. याबाबत आमच्या वरिष्ठांना पुलाच्या संदर्भात वरिष्ठांना माहिती देण्यात आली. त्यानंतर 2013मध्ये पुलाच्या दुरुस्तीची निविदा काढण्यात आली, परंतु काही कारणाने ती रद्द झाली. 2018 मध्ये स्ट्रक्चर ऑडिट, फाऊंडेशन ऑडिट करण्यात आले आणि त्यांच्या अहवालानुसार दुरुस्तीची निविदा पुन्हा काढण्यात आली असून, आता लवकरच पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
श्रीकांत राऊत, उपअभियंता, मऔविम, रसायनी-पाताळगंगा