| श्रीवर्धन | मकसुद नाझिरी |
श्रीवर्धन तालुक्यातील मेटकर्णी येथील एका सात महिन्याच्या बालकाच्या मृत्युच्या घटनेने श्रीवर्धनमधील वातावरण चांगलच तापलं आहे. श्रीवर्धन मेटकर्णी येथिल युवराज राम वाघाटे (वय सात महिने) हा चिमुकला आजारी असल्यामुळे 3 व 4 ऑक्टोबर रोजी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी दुसऱ्या डॉक्टरांकडे उपचार घेण्यात आले. त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी पुन्हा खासगी रुग्णालयात युवराजला उपचारासाठी आणण्यात आलं. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून इंजेकशन दिलं.
प्रकृती स्थिर असल्यामुळे युवराजच्या आई वडिलांनी त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार घरी नेलं. घरी आल्यानंतर तहान लागली असेल म्हणून ड्रॉपच्या सहाय्याने दोन थेंब पाणी पाजलं. मात्र बाळ बेशुद्ध झाल्यामुळे त्यास पुन्हा उपचार सुरु असलेल्या खासगी रुग्णालयात आणण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी बाळाला तपासून मृत घोषित केलं.
या प्रकरणामुळे संतप्त जमावाने संबंधित दवाखान्यात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला. दवाखान्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले असून लहान बाळाच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविछेदन करून पुढील तपासासाठी पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एम.चौधरी अधिक तपास करीत आहेत.