| नेरळ | वार्ताहर |
नेरळ माथेरान घाट रस्त्यात चांगभले मंदिर येथे असलेल्या वळणावर दरड कधीही कोसळून घाटरस्ता बंद होण्याची स्थिती अनेक वर्षे आहे. घाटरस्त्यातील धोकादायक स्थितीत असलेली दरड सुरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. माथेरान पर्यटनस्थळी जाण्यासाठी घाटरस्ता एकमेव रस्ता असून या घाटात पावसाळयात दरवर्षी दरडी कोसळून घाटरस्ता बंद होण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे माथेरान घाटरस्ता सुरक्षित करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुरु आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून घाटरस्त्यात विकासकामे केली आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटात मागील काही महिने नियोजन करून घाटातील वॉटर पाईप भागात डोंगरातील दगड रोखण्यासाठी लोखंडी जाळी बसविण्याचे काम पूर्ण केले आहे. आता चांगभले मंदिर येथील वळणावर असलेले ठिकाणी दरडी कोसळू नये यासाठी लोखंडी जाळी लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजीव वानखेडे आणि शाखा अभियंता अक्षय चौधरी यांच्या उपस्थितीत हे काम सुरु आहे.