| पंढरपूर | वृत्तसंस्था |
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पांडुरंग परिवार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीचे पंढरपुरात आयोजन करण्यात आले आहे. दि.17 आणि 18 ऑक्टोबरला बाजार समितीच्या प्रांगणात निवड चाचणी होणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांनी दिली.
65 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा लवकरच होणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी सध्या सर्वत्र निवड चाचणी होत असून सोलापूर जिल्ह्याची निवड चाचणी यंदा पंढरपुरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात होणार आहे. युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. मातीतील कुस्ती, मॅटवरील कुस्ती आणि खुला गट अशा चार भागांमध्ये निवड चाचणीला सुरवात होणार आहे. कुस्तीतील जागतिक सुवर्णपदक विजेते राहुल आवारे यांच्या हस्ते या निवड चाचणीचे उद्घाटन होईल. सलग दोन दिवस चालणाऱ्या निवड चाचणीमध्ये कुमार केसरी स्पर्धेचीही निवड चाचणी होणार आहे. तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते आणि उमेश परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली या निवड चाचणीतील कुस्तीगिरांचा बक्षीस वितरण समारंभ होईल. जिल्ह्यातील कुस्तीपटू पैलवानांनी सहभागी व्हावे असे आवाहन उपसभापती राजुबापू गावडे यांनी केले आहे.