| अलिबाग | प्रतिनिधी |
भाताची पिके बहरली असून कापणीयोग्य झाली आहेत. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून रायगड जिल्ह्यात अलिबागसह अनेक भागात भात कापणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 15 टक्के कापणीची कामे पुर्ण झाली आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही कामे पुर्ण होतील असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यामध्ये 94 हजार हेक्टर क्षेत्रामध्ये भात पिकांची लागवड करण्यात आली आहे. कोलम, सुवर्णा, रत्ना अशा अनेक पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. पावसाचा हंगाम संपल्यावर हवेत गारवा निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे भात शेती बहरू लागली आहे. कापणीयोग्य पिक झाल्याने शेतकऱ्यांनी गेल्या आठ दिवसांपासून कापणीला सुरुवात केली आहे. दुपारी ऊन लागत असल्याने पहाटेपासूनच भात कापणीला सुरुवात केली जात आहे. सध्या कापणीचा वेग मंद गतीने सुुरू आहे. नवरात्रौत्सवानंतर कापणीची लगबग वाढण्याची शक्यता आहे.
मजुरांना मिळणार रोजगार भात कापणीला सुरुवात झाल्याने गावातील मजुरांना आता रोजगाराचे साधन खुले झाले आहे. दिवसाला 250 ते 300 रुपये अशी मजुरी त्यांना दिली जात आहे. हे काम 20 ते 25 दिवस असल्याने मजुरांना यातून रोजगार मिळणार आहे.
भात कापणीला सुरुवात झाली आहे. कापणी केलेली रोपे तीन ते पाच दिवस उन्हात तापवल्यानंतर रोपे रचण्याचे काम केले जाणार आहे. 250 ते 300 रुपयांपर्यंत मजुरी आहे. स्थानिकांसह बाहेरुनही कामगार कापणीसाठी येतात.
वसंत पारंगे, शेतकरी