| म्हसळा | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्यात शासनाने प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास आणि गोहत्या करण्यास बंदी घातली असतानाही तशा प्रकारच्या घटना म्हसळा तालुक्यात अधूनमधून होतच असतात. त्याचबरोबरीने गुरे चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. गोहत्या करण्यात आल्याची घटना दि.20 रोजी म्हसळा तालुक्यातील वरवठणे गावात झाली होती. याप्रकरणी आरोपी शाहीद सानाउल्ला तालिब, रा. वरवठणे (27) याला म्हसळा पोलिसांनी गोहत्या करताना रंगेहाथ पकडले आहे.
आरोपी शाहीद तालिब याच्याविरोधात पोलिस हवालदार रामचंद्र बांगर यांनी फिर्याद दिली असता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीसांकडून अधिक माहिती घेतली असता आरोपीने घराच्याशेजारी असलेल्या गोठ्यात स्वतःच्या फायद्यासाठी शासनाने प्रतिबंध केलेल्या गोवंश जातीच्या तांबड्या रंगाचे खोंडाची बेकायदेशीर हत्या केली होती. याबाबत गावाशेजारील कर्तव्यदक्ष नागरिकांना हत्या केलेल्या गोवंशाचे अवयव उघड्यावर टाकलेल्या अवस्थेत दिसून आले असता त्यांनी लागलीच म्हसळा पोलिसांना माहिती दिली. म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे आणि त्यांचे सहकारी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता लागलीच कारवाई केल्यान आरोपीला अटक करणे शक्य झाले. पोलिसांच्या या कारवाईबद्दल नागरिकांकडून कौतुक होत आहे. घटनेचा अधिक तपास सपोनि एडवळे हे करीत आहेत.