रायगड पोलिसांनी दिली सशस्त्र मानवंदना
| चणेरा | वार्ताहर |
जिल्ह्याचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी पहाटे मोठया उत्साहात सुरूवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर व पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी पालकमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, राजकिय पक्षांचे प्रमुख आणि शासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सलामी सोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. या उत्सवानिमित्त मंदिराचा संपुर्ण परिसर विविध रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता. पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झाले होते. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मार्गस्त झाली. शहरातील ठरलेल्या मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्तांना दर्शन देत पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी मंदीरात परतणार आहे. यावेळी महाराजांना पोलिस मनवंदना देण्यात येते. पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणचे रस्ते फुलांसह रांगोळ्यांनी सजले होते. विद्युत रोषणाईमुळे त्यामध्ये अधिक भर पडली. रोहयात पालखीच्या दर्शना साठी येणाऱ्या भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक मंडळांमार्फत थंड पेये आणि अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. अशिर्वाद मंडळातर्फे गेली अनेक वर्ष भाविकांसाठी मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली होती.