| अलिबाग | प्रतिनिधी |
खानावच्या विकासाचा अजेंटा समोर ठेवून ग्रामविकास परिवर्तन पॅनल निवडणूकीच्या रिंगणात उभे राहिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराला खानावमधील मतदारांसह कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र जमावातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हे पॅनल प्रचाराच्या माध्यमातून आघाडीवर असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
खानाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलद्वारे थेट सरंपच पदासाठी अजय दशरथ नाईक, सदस्य पदासाठी प्रभाग एकमध्ये निलेश जयराम गायकर, विशाखा विजय गायकर, सज्जला संदेश शिंदे, प्रभाग दोनमध्ये राजेश अनंत टोपले, प्रणित दिलीप पाटील, प्रभाग तीनमध्ये संदेश दत्तात्रय पडवळ, मनीषा महेंद्र म्हात्रे, प्रभाग चारमध्ये साहिल सुरेश म्हात्रे, प्रभावती शत्रुघ्न ठाकूर, प्रभाग पाचमध्ये अनिकेत दत्तात्रेय नाईक, सुचिता सतिश म्हात्रे, युक्ता योगेश गुजर उमेदवार रिंगणात आहेत.
खानाव ग्रामपंचायत हद्दीत खानाव, उसर, मुळखानाव, वनवली, भादाणे, वेलवली वेलेटवाडी, कुणे, नाईक कुणे, भेरसे, माळी भेरसे, देऊळ भेरसे, कंटक कुणे, घमशानवाडीचा समावेश आहे. सत्ताधाऱ्यांची असलेली मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी गावांच्या विकासाचा मुद्दा समोर ठेवून ग्रामविकास परिवर्तन पॅनलमार्फत ही निवडणूक लढविली जाणार आहे. ग्रामपंचायत हद्दीत 3 हजार 800 मतदार आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने खानावमध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रचाराला कार्यकर्त्यांसह मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्ते हिरहीरीने सहभाग घेऊन ही निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
रविवारी 29 ऑक्टोबर रोजी उसर येथून प्रचार रॅली काढण्यात आली. उमेदवार तथा प्रवर्तक निलेश गायकर यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये तरुणांसह महिला, ज्येष्ठ नागरिक, पुरुष मंडळी मोठ्या संख्येेने सहभागी झाले.
निधी नयन पाटील बिनविरोध खानावमध्ये ग्रामविकास परिवर्तन पॅनलद्वारे सदस्यपदासाठी उभ्या असलेल्या प्रभाग दोनमधील एक जागा बिनविरोध ठरली आहे. निधी नयन पाटील यांचा एकमेव अर्ज वैध ठरल्याने विरोधकांना सुरुवातीपासूनच हार मानावी लागली. त्यामुळे निधी पाटील या बिनविरोध ठरल्याने पॅनलचा विजय हा निश्चितच होणार, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.