। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 6.4 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला, ज्याचे धक्के भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले. या विनाशकारी भूकंपात नेपाळमध्ये आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाल्याचं माहीती आहे. रात्री 70 जणांनी आपले प्राण गमावले होते. आणखी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नेपाळमध्ये एका महिन्याच्या आत झालेला हा तिसरा भूकंप आहे. उत्तर भारतात या भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. नेपाळमधील मध्यवर्ती पट्टा “सक्रियपणे ऊर्जा सोडणारे क्षेत्र” म्हणून ओळखले जात असल्याने लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा भूकंपशास्त्रज्ञाने दिला आहे. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी येथे काम केलेले भूकंपशास्त्रज्ञ अजय पॉल यांनी सांगितले की, शुक्रवारी भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या डोटी जिल्ह्याच्या जवळ होता. नोव्हेंबर 2022 मध्ये जिल्ह्यात 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता. 3 ऑक्टोबर रोजी नेपाळमध्ये एकापाठोपाठ आलेल्या भूकंपांची मालिकाही याच भागाच्या आसपास असल्याचे त्यांनी सांगितले. जरी पश्चिमेकडे थोडेसे असले तरी ते नेपाळच्या मध्यवर्ती पट्ट्यात आहेत, असे पॉल म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी लोकांनी सतर्क आणि दक्ष राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.