| पनवेल | वार्ताहर |
दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेने गजाआड केले असून त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल करून एकूण सात मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. सदरच्या मोटारसायकलची किंमत सुमारे दोन लाख 75 हजार आहे.
खारघर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत असताना गुन्हयातील घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्हयातील आरोपी रमेश लक्ष्मण कडाळी (25) मु.पो. वारंघुशी, ता.अकोले जि.अहमदनगर व हर्षल काशिनाथ घाणे (22) रा.सीबीडी बेलापुर यांचा शोध घेतला असता सदर आरोपी बेलापुर रेल्वे स्टेशन पार्किंग येथे असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्यांना शिताफीने पकडले. आरोपींकडून आत्तापर्यंत खारघर, कळंबोली, बेलापूर, कोळसेवाडी, कामोठे, खांदेश्वर या भागातून चोरलेल्या गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.