| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) कठोर कारवाई करत श्रीलंका क्रिकेट बोर्डाला तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. श्रीलंकेच्या संसदेने गुरुवारी एकमताने ठराव मंजूर केल्यानंतर आयसीसीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
या ठरावात श्रीलंका क्रिकेट बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली, ज्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. आयसीसीने असा निष्कर्ष काढला की श्रीलंका क्रिकेट एक सदस्य म्हणून आपल्या दायित्वांचे गंभीर उल्लंघन करत आहे. त्यांना त्यांचे सर्व व्यवहार स्वतंत्रपणे हाताळावे लागतात. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने कारभार किंवा प्रशासनात सरकारी हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे.
आयसीसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, निलंबनाच्या अटी आयसीसी बोर्ड योग्य वेळी ठरवेल. 21 नोव्हेंबर रोजी आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे, त्यानंतर पुढील पावले उचलली जातील. श्रीलंका पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे.
जोपर्यंत आयसीसी श्रीलंका क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवत नाही, तोपर्यंत श्रीलंकेला आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. मात्र, चांगली बाब म्हणजे क्रिकेट विश्वचषकातील श्रीलंका संघाचे सर्व सामने आटोपल्यानंतर आयसीसीने ही कारवाई केली आहे, त्यामुळे विश्वचषकाच्या वेळापत्रकावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.