| कर्जत | वार्ताहर |
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर पक्ष प्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
साईकृपा शेळके बंधू सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांच्या जाहीर पक्ष प्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मावळ लोकसभा निरीक्षक माधवी जोशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नरेश जोशी, जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, कार्याध्यक्ष तानाजी चव्हाण, जैबुननीता शेख, हमीद शेख आदी उपस्थित होते. कर्जत तालुका भावी अध्यक्ष शंकर भुसारी, पनवेल तालुका अध्यक्ष डॉ. साईनाथ डोईफोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
शिवसेना ठाकरे गटाचे खोपोली संपर्क प्रमुख हमीद शेख यांनी देखील प्रवेश केला. मी 1985 पासून शिवसैनिक आहे. माझ्या पक्षाने मला काही कमी केले नाही मात्र केवळ माधवी जोशींसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे, असे शेख यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्ष जैबुननिता शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करण्यात आले.
विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. चहा विकणारे पंतप्रधान होऊ शकतात, तर एका शेतकऱ्याची लेक किंवा सून खासदार का होऊ शकणार नाही. माझ्यावर शरद पवारांनी विश्वास दाखवून पक्षाचे कार्य करण्याचा आदेश दिला आहे. त्या आदेशाचे पालन प्रामाणिकपणे करण्याचा मी निर्धार केला आहे, असे माधवी जोशी यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा पुन्हा उभारी घेईल. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागणार असल्याने सर्वांनी तयारीला लागा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे यांनी केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







