मातोश्रीनगरला पावसाचा बसणार फटका
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावरच मातोश्रीनगर येथे रस्त्यावर असलेल्या नाल्याला पाटबंधारे विभागाकडून संरक्षण भिंत बांधली जात आहे. या भिंतीमुळे नाल्याच्या आजूबाजूला असलेल्या रहिवासी घरांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होणार आहे, असे सांगण्यात येते. मात्र, या नाल्याचे एका बाजूने बांधल्या जात असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम होत असताना काढण्यात आलेली माती नाल्यात टाकण्यात आल्याने ती पावसाच्या पाण्याला अडथळा ठरु शकते. याकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा दाखवला असल्याचे स्थानिक बोलत आहेत.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील मातोश्रीनगर भागातून येणारे पावसाचे पाणी मागील काही वर्षे या परिसरातील रहिवाशांचे घरात घुसत आहे. त्यात तेथील नाल्याच्या बाजूला सातत्याने अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. त्यामुळे नाल्याची रुंदी दरवर्षी कमी होत चालली आहे. त्यात या नाल्याच्या अगदी बाजूने कळंब राज्यमार्ग रस्ता आहे, त्यामुळे वाहने रस्त्याच्या खाली जाऊन नाल्यात कोसळण्याचदेखील भीती आहे. ते लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायत सदस्य जयश्री मानकामे यांनी रस्त्याचे आणि नाल्याचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण भिंतीचे काम मंजूर करावे यासाठी आ. महेंद्र थोरवे यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, याठिकाणी नाल्याच्या कडेला पाटबंधारे विभागाकडून संरक्षण भिंत बांधण्याचे काम मंजूर झाले होते. ते काम गेली महिनाभरापासून सुरू आहे. त्या ठिकाणी बांधण्यात येत असलेल्या संरक्षण भिंतीचे काम हे नियमानुसार झालेले नाही, असे स्थानिक बोलत जात आहे.
दुसरीकडे या संरक्षण भिंतीमुळे पावसाळ्यातील पाण्यापासून रक्षण होऊ शकते. पण, या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी खोदकाम केले गेले आणि तेथून काढलेली माती बाजूला नाल्यात टाकण्यात आली आहे. त्याचा परिणाम या नाल्याची रुंदी अधिक कमी झाली आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने नाल्याची रुंदी वाढविण्यासाठी संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यासाठी निधी मंजूर केली आहे. मग नवीन भिंत बांधण्यासाठी खोदकाम करताना काढलेली माती समोरच नाल्यात टाकली आहे. ही माती पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा ठरणार आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस श्रीराम राणे यांनी पाटबंधारे खात्याने त्या नाल्यात टाकलेली माती काढावी तसेच संपूर्ण नाल्याची साफसफाई करण्यात यावी, अशी सूचना पाटबंधारे खात्याला केली आहे.







