। उत्तराखंड । वृत्तसंस्था ।
उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील बचावकार्य अखेर 17 दिवसांनंतर संपले आहे. बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना 17 दिवसांनंतर बाहेर काढण्यात यश आलं आहे. सर्व कामगार सुखरुप बोगद्याबाहेर आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या बचावकार्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. यामुळे मजुरांच्या घरी आता दिवाळी साजरी केली जात आहे.
गेल्या 17 दिवसांपासून म्हणजेच 12 नोव्हेंबरपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते. उत्तरकाशीतील सिल्क्यारा बोगद्यात 41 कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या होत्या. कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या होत्या. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एनडीआरएफ), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, जे प्रकल्प बांधत आहेत आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस यासह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी होत्या.
17 दिवसांनंतर सुखरूप सुटका सर्व 41 कामगारांची सुखरुप सुटका झाल्याने त्यांची कुटुंबे खूप आनंदी आहेत, पण हे 17 दिवस त्यांच्यासाठी किती कठीण होते हे फक्त त्यांनाच माहीत आहे. चार धाम राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पात झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार आणि यूपीसह विविध राज्यांतील कामगार काम करत आहेत. गरिबीमुळे ते घरापासून लांब राहून येथे काम करत होते. त्यामुळे देशातील आठ राज्यांत राहणाऱ्या या 41 कामगारांसाठी आज उत्सवाचे वातावरण आहे. झारखंडमध्ये सर्वाधिक उत्सवाचं वातावरण आहे, कारण झारखंडमधील 15 जण बोगद्यामध्ये अडकले होते. यासोबत उत्तर प्रदेशमधील 8 जण, उत्तराखंडमधील 2 मजूर, हिमाचल प्रदेशातील 1, बिहारमधील 5, पश्चिम बंगालमधील 3, आसाममधील 2 आणि ओडिशातील 5 मजूर अडकून पडले होते. हे सर्व 41 मजूर सुखरुप बाहेर आलेले आहेत.
बोगद्यात अडकलेल्या मजुरांची नावे विशाल (हिमाचल प्रदेश), गब्बरसिंग नेगी, राम सुंदर (उत्तराखंड), सबा अहमद, सोनू शहा, वीरेंद्र किस्कू, सुशील कुमार, दीपक कुमार (बिहार), मनीर तालुकदार, सेविक पाखेरा, जयदेव प्रामाणिक (पश्चिम बंगाल), अंकित, राम मिलन, अखिलेश कुमार, सत्यदेव, संतोष, जय प्रकाश, मनजीत (उत्तर प्रदेश), सपन मंडल, भगवान बत्रा, विशेष नायक, राजू नायक, धीरेन (ओडिशा), विश्वजित कुमार, सुबोध कुमार, अनिल बेदिया, शजेंद्र बेदिया, सुक्रम, टिकू सरदार, गुणधर, रणजीत, रवींद्र, समीर, महादेव, मुडटू मुरम, चमरा उराव, विजय होरो, पुष्कर, गणपती (झारखंड), संजय, राम प्रसाद (आसाम).
उत्तराखंडच्या सिल्क्यरा बोगद्यात गेल्या 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांची संपूर्ण देश सुखरूप बाहेर येण्याची वाट पाहत होता. कामगार सुखरुप बाहेर आल्यानंतर घटनास्थळी उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दिवाळीच्या दिवशी अडकलेले मजूर 17 दिवसानंतर बाहेर आल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी दिवाळी साजरी केली. मजुरांच्या कुटुंबियांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटत हा आनंद साजरा केला.