जिल्हा शल्यचिकित्सक यांची शस्त्रक्रिया
| अलिबाग | प्रतिनिधी |
इच्छाशक्ती आणि कामाप्रती निष्ठा असेल तर अशक्य असलेली गोष्टही सहज शक्य करता येते. हे अलिबागमधील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दाखवून दिले आहे. आजाराने त्रस्त असलेल्या आठ वर्षाच्या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला नवजीवन देण्याचे काम केले.
प्रविका विश्वास शिंदे असे या मुलीचे नाव आहे. ती म्हसळा तालुक्यातील चिकलगाव येथील आहे. तीला गेल्या अनेक दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होता. खासगी दवाखान्यात तिच्यावर उपचार करण्यात आले होते. तरीदेखील तिची प्रकृती बिघडली होती. 30 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तिला अधिक उपचारासाठी अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास देवमाने यांनी तात्काळ पाहणी करून तिच्यावर योग्य उपचार करण्यास सुरुवात केली. तिच्या आजारापणावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. अखेर भूलतज्ञ यांच्या मदतीने त्या मुलीची शस्त्रक्रिया करण्यात आली. तिच्या पोटातून सुमारे 300 ते 350 मिली पु (घाण ) काढण्यात आला. शस्त्रक्रिया यशस्वी करण्याकरिता डॉ.राजेशा के, डॉ.आनंद हेगडे, भूलतज्ञ डॉ.सुश्मिता बी व शस्त्रक्रिया गृहातील परिचारिका यांचे विशेष सहकार्य लाभले.
तीन महिन्यात दोनशे शस्त्रक्रिया
रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना यापुर्वी मुंबईत अधिक उपचारासाठी पाठविले जात होते. वेळेवर उपचार झाले नसल्याने अनेकांचा रस्त्यातच मृत्यू झाला आहे. अंबादास देवमाने यांनी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार स्विकारल्यावर कोविड कालावधीमध्ये बंद पडलेला शस्त्रक्रिया विभाग सुरु केला. तीन महिन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.







