| नागपूर | प्रतिनिधी |
यंदाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार नागपुरात मुक्कामी आहे. सध्याच्या राज्यातील प्रश्नांना घेऊन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या काळात विविध आंदोलनं होणार आहेत. जवळपास 100 मोर्चे विधिमंडळात धडकणार असल्याची माहिती आहे. यातच्या 45 पेक्षा जास्त मोर्चांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सभागृहासह सभागृहाच्या बाहेरच्या आंदोलनांनी यंदाचं अधिवेशन गाजणार आहे.
उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चिले जाण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा यंदाच्या अधिवेशनात चर्चेत येऊ शकतो. मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही विरोधक लावून धरू शकतात. काही दिवसांआधी राज्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची भरपाई, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या मुद्द्यांवरुन सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनिती ठरवण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. विरोधकांच्या बैठकीत विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.