| मुंबई | प्रतिनिधी |
भारतीय महिला क्रिकेट संघ बलाढ्य इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यास सज्ज झाला आहे. ट्वेन्टी-20, एकदिवसीय आणि या दोन्ही देशांविरुद्ध कसोटी सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. हे सर्व सामने मुंबई आणि नवी मुंबईत होणार असून, सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वखाली भारतीय संघ प्रथम इंग्लंडविरुद्ध तीन ट्वेन्टी-20 सामने आणि एक कसोटी खेळणार आहे. यातील पहिला सामना उद्या दि. 7 डिसेंबरला वानखेडेवर होणार आहे. त्यानंतर 14 ते 17 डिसेंबर या कालावधीत कसोटी सामना होईल आणि ही मालिका संपेल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट द्वंद्वाची सुरुवात कसोटी सामन्याने होईल. ही कसोटी 21 ते 24 डिसेंबर या कालावधीत होईल. त्यानंतर तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांची मालिका होईल. यातील अखेरचा सामना 9 जानेवारी रोजी पार पडेल.