| नाशिक | प्रतिनिधी |
कांदा पीकामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळतात. त्यासाठी शेतकरी कष्ट करतात. परंतु केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नसेल तर, शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
चांदवडमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनात पवार सहभागी झाले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी केंद्र सरकारला जबाबदार आहे. कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली.
आम्हाला रस्त्यावर बसायची हौस नाही, आम्हाला रास्तारोको करुन लोकांना त्रास द्यायचा नाही. पण हे केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. कांदा निर्यातबंदीनंतर इतके दिवस राज्यातील सत्ताधारी त्याबद्दल बोलत नव्हते. पण आज चांदवडमध्ये आंदोलन होणार हे कळाल्यानंतर सकाळपासून सत्ताधारी नेते आम्ही केंद्राशी चर्चा करणार, असे सांगू लागले आहेत. सध्याचे राज्यकर्ते शेतकऱ्यांसाठी योग्य धोरणं आखणारे नाहीत, अशी टीका त्यांनी केली.