सुकी मच्छी, भाजीपाला खरेदीला पसंती
| तळा |वार्ताहर |
शहरात पावसाळ्यात बंद असलेला आठवडा बाजार आता पुन्हा सुरु झाला आहे. बाजारात खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांची आर्थिक चक्रे गतीमान झाली आहेत.
सध्या कांद्याने सर्वसामान्यांना रडविले आहे. खुल्या बाजारात 80 ते 90 रुपये प्रतिकिलो याप्रमाणे कांद्याची विक्री सुरू आहे. मात्र बुधवारच्या बाजारात कांदा 70 रुपये प्रति किलो दराने विकला जात असल्याने कांदा, बटाटे, खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे. त्यातच भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले असले, तरी आठवडा बाजारात वाजवी किमतीत असल्याने उलाढाल वाढली आहे. बाजारात सुकी मच्छी नेहमीच मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असते. सुक्या मच्छीच्या खरेदीसाठी तालुक्यातील ग्राहक आवर्जून येतात. सुरमई, बोंबिल, बारीक सुकट, अंबाडी सुकट, मांदेली, म्हाकल्या, खारे मासे, अशा अनेक प्रकारची सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असल्याने या सुक्या मच्छीला बाजारात मोठी मागणी आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक आठवडा बाजारात आवर्जुन सुकी मच्छी खरेदी करण्यासाठी आले होते. याबाबत बाजारातील व्यापाऱ्यांना विचारले असता मागील बाजारापेक्षा यावेळी बाजारात ग्राहक अधिक प्रमाणात खरेदीसाठी येत आहेत. तसेच सर्वच प्रकारचा माल खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा असल्याचे त्यांनी सांगितले.







