| अलिबाग | प्रतिनिधी |
नुकतीच पाच राज्यात निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपला फक्त 41 टक्के मते मिळाली.59 टक्के मते भाजपला कमी मिळाली आहेत. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत हे चित्र बदलू शकते. इंडिया आघाडीला पुन्हा सत्तेत येण्याची संधी आहे. त्या दिशेेने वाटचाल सुरु आहे. पुढील निवडणुका इंडिया आघाडीतूनच लढविल्या जाणार आहेत. मावळसह रायगडमध्ये खासदार आपलाच असणार आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागले पाहिजे, असे आवाहन शिवसेना नेते तथा माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी केले.
ठाकरे गटाच्या शिवसेना अलिबाग तालुक्याच्या वतीने मेळाव्याचे आयोजन बुधवार ( दि.13) डिसेंबर रोजी चेंढरे येथील भाग्यलक्ष्मी सभागृहात करण्यात आले. यावेळी गिते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, संपर्क प्रमुख विष्णू पाटील, जिल्हा युवासेना प्रमुख पिंट्या उर्फ अमिर ठाकूर, तालुका प्रमुख शंकर गुरव, संदिप पालकर, कमलेश खरवले, सतिश पाटील, दिपश्री पोटफोडे आदी मान्यवरांसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते.
यावेळी अनंत गीते म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून ओळख होती. देशात भाजपकडून गलिच्च राजकारण सुरू आहे. सत्तेसाठी सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख पुसण्याचे काम केले जात आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नीच राजकारण केले जात आहे.घराघरात वाद घालण्याचे काम हे करीत आहेत. त्याची शिक्षा भाजपला भोगावी लागणार आहे. इंडिया आघाडीमार्फत आगामी निवडणुक लढविली जाणार आहे. जनताच भाजपाला नेस्तनाबूत करणार आहे. रायगड व मावळ मतदार संघातील लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवून एक वेगळा इतिहास घडवायचा आहे. कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून मोठ्या जोमाने पुन्हा एकदा कामाला लागा, असे प्रतिपादन अनंत गीते यांनी यांनी आवाहन केले.
गद्दारी करणाऱ्यांना जनताच जागा दाखवेल- सुरेंद्र म्हात्रे
आपल्या पक्षाशी आमदारांनी गद्दारी केली. परंतु मुळ कार्यकर्ते आपल्या सोबत राहिले. नुकतीच ग्रामपंचायत निवडणुक झाली. या निवडणूकीत आपल्याला चांगले यश आले. लवकरच पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे आतापासून आपल्याला कामाला लागले पाहिजे. गद्दारी करणाऱ्यांना जनताच जागा दाखवेल, असे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.