| माणगाव | प्रतिनिधी |
रातवड येथील छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित, माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयातील शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव मंगळवार, दि. 12 व बुधवार, दि. 13 डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या महोत्सवाच्या निमित्ताने सांघिक व वैयक्तिक खेळामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन मंगळवार, दि. 12 डिसेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच वैशाली जाधव उपसरपंच व शालेय समिती सदस्य सतीश पवार, माजी विद्यार्थी संघ सचिव राकेश सावंत व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. क्रीडा ज्योत प्रज्वलित करून विद्यार्थ्यांनी मान्यवरांना मानवंदना दिली. दि. 12 डिसेंबर रोजी कबड्डी, लंगडी व लगोरी या सांघिक खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. दि. 13 डिसेंबर रोजी विविध मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या. या क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण 13 डिसेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत भुवन सरपंच दीपक जाधव, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद भाटे, कीर्तनकार मंदार भावे, अर्चना पालकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक नेहा ऐत यांनी केले. प्रास्ताविक क्रीडा शिक्षक श्रीकृष्ण गरधे यांनी केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक महादेव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडा विभाग प्रमुख श्रीकृष्ण गरधे, क्रीडा शिक्षक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियोजनातून उत्साहपूर्ण वातावरणात क्रीडा महोत्सव संपन्न झाला.







