मुरुडचे तापमान 23 सेल्सिअसवर; आगामी काळात पर्यटन अधिक बहरणार
| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
यंदा मुरूड तालुक्यात विचित्र हवामानामुळे थंडी उशिराने पडल्याचे जाणवले आहे. डिसेंबर महिन्यात पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यानंतर थंडीचे आगमन झाल्याने पर्यटकदेखील खूष होताना दिसून येत आहेत. सध्या तालुक्यात सकाळी आणि रात्री उशिरा तापमान 23 सेल्सियसइतके खाली येत असून, थंडीचा जोर वाढल्याने स्थानिकांसह पर्यटकांनाही हुडहुडी भरली आहे. या अल्हाददायक वातावरणामुळे आगामी काळात पर्यटन बहरणार आहे. नाताळला जोडून सुट्टी असल्याने तालुक्यात विक्रमी संख्येने पर्यटक हजेरी लावतील, असा विश्वास पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक मंडळींनी व्यक्त केला आहे.
डिसेंबर महिन्यात थंडी आणि आल्हाददायक वातावरण असते. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढती असते. तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांवर सांगली, सोलापूर, नाशिक, सातारा, पुणे, रायगड, बीड, खानदेश, धुळे येथून एसटी बसेसमधून शालेय सहली मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली आहे. सायंकाळी सूर्यास्त, समुद्रकिनारा पाहणे, पाण्यातील जलक्रीडा आदींचा आनंद लुटण्यासाठी विद्यार्थी आतुर दिसून येत आहेत. जंजिरा जलदुर्ग सर्वांचे आकर्षण असल्याने येणारे विद्यार्थी आणि पर्यटक हमखास भेट देताना दिसत आहेत.टीव्ही मालिकेत जंजिरा पाहणे आणि प्रत्यक्षात येथे येऊन पाहणे यात जमीन अस्मानाचे अंतर असल्याचे अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी सांगितले.
अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे रम्य आणि अप्रतिम असल्याने शालेय सहली आणि पर्यटक आकर्षित होताना दिसून येत आहेत. मुरूड समुद्रकिनाऱ्याचे सुशोभिकरण सुरू असून, किनाऱ्यावरच प्रशस्त पार्किंगचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. सुशोभीकरणाचे एकूण सर्व काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली. यासाठी सुमारे 11 कोटी खर्च येणार असून, निधी प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.
मार्केटमध्ये ताजी मासळी उपलब्ध
मुरुडच्या मासळी मार्केटमध्ये शुक्रवारी पापलेट, कोलंबी, हलवा आदी मच्छी उपलब्ध होती. मुरूडजवळील राजपुरी येथून सकाळी ही ताजी पापलेट काही प्रमाणात येत आहेत.शिवाय बांगडे, सुरमई, रावस, माखुल, मांदेली आदी प्रकारची ताजी मासळी आल्याचे दिसत होते. मात्र, मासळीचे दर अटकेपार आहेत. पापलेट जोडी 400/- पर्यंत, तर कोलंबीचे सोडे 1500 ते 1600 रुपये किलोने विक्री करण्यात येत आहेत.