उपांत्य फेरीत बांगलादेशकडून पराभव
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दुबईत खेळल्या जात असलेल्या अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या भारतीयांच्या आशा मावळल्या आहेत. बांगलादेशने उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव केला. भारतीय संघाला 4 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशच्या गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजांनी हार पत्करली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ अवघ्या 188 धावांत गारद झाला. यानंतर बंगाली फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाज बेरंग दिसले.
बांगलादेशचा कर्णधार महफुजुर रहमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगाली गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांच्या ठराविक अंतराने गडी बाद केले. सलामीची जोडी 10 धावांतच तंबूमध्ये परतली. 13 धावा झाल्या तोपर्यंत कर्णधार उदय शून्यावर बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने गडी बाद होत राहिले. भारतीय संघासाठी केवळ मुशीर खान (50) आणि मुरुगन अभिषेक (62) यांनाच मोठी खेळी करता आली. याशिवाय एकाही फलंदाजाला 19 धावांच्या पुढे जाता आले नाही. सहा खेळाडूंना दुहेरी अंकही गाठता आला नाही. त्यामुळे भारतीय संघ 42.4 षटकांत 188 धावांवरच मर्यादित राहिला. बांगलादेशकडून मारूफ मृदाने चार बळी घेतले.
दरम्यान, 189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवातही खराब झाली. 34 धावांवर आघाडीचे तीनही फलंदाज तंबूमध्ये परतले होते. येथून अरिफुल इस्लामने 90 चेंडूंत 94 धावा आणि अहरार अमीनने 101 चेंडूंत 44 धावा करत बांगलादेशचा विजय निश्चित केला. दोघांमध्ये 138 धावांची भागीदारी झाली. संघाच्या 172 धावांवर आरिफुल बाद झाला. यानंतर बांगलादेशी संघ गडबडला आणि परत दोन गडी पटापट बाद झाले. पण, त्यांना सामना जिंकण्यापासून रोखता आला नाही. भारतीय संघाकडून नमन तिवारीने तीन आणि राज लिंबानीने दोन गडी बाद केले.