| पनवेल | वार्ताहर |
स्थानिकांना उद्ध्वस्त करणारा विकास काय कामाचा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला. आगामी अधिवेशनानंतर राज्य शासनासोबत बैठक घेऊन नैना प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा कळंबोलीतील श्रीमती शामल मोहन पाटील विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
या भागातील विकास करताना सिडको तसेच साडेबारा टक्क्यांचा प्रश्न त्याचप्रमाणे माथाडी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडविण्याचे काम आम्हीच सत्तेत असताना केले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातील माथाडी बांधव वास्तव्यास आहेत. त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही आहे, असे पवार म्हणाले. काही भांडवलदार स्वतःच्या फायद्यासाठी या सरकारमध्ये असून, मुंबईतील अनेक उद्योग गुजरात, सूरत येथे नेण्याचे काम सुरू आहे. यासाठी आता एकजुटीने यांच्याविरुद्ध आवाज उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवारांवर टीका करणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम असून, भाजपच्या बैठकीमध्येसुद्धा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी फक्त शरद पवारांवर टीका करण्यामध्येच आपला वेळ घालवला, असा टोला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. मुख्यमंत्री मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, ही आमची मागणी आहे. रायगड जिल्ह्याच्या पुनर्बांधणीसाठी येथील कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
छत्रपती शिवरायांच्या पावनभूूमीत गद्दारांना थारा नाही हा इतिहास आहे. नुकताच कर्जत येथे एका मेळावा पार पडला. या मेळाव्यात येथील नेत्यांनी फक्त शरद पवारांवर टीका केली. काही गद्दार हे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचे काम पक्षात राहून करत होते, असा घणाघात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. पक्ष सोडून गेलेल्यांना आगामी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आता परिवर्तनाची लाट सुरू झाली आहे. आपल्याला बदल घडवायचा आहे. हा संकल्प महाराष्ट्रातील जनतेने केला असल्याचे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे त्यांनी सांगितले.
तटकरे हे मकटफ करे असून, त्यांनी शरद पवारांचे घर फोडण्याचे काम केले आहे. तटकरेंनी फक्त आपले कुटुंब व त्यांचा फायदा त्यांनी पाहिला. नेहमीच कार्यकर्त्यांना त्यांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले. भाजपच्या ईडीमुळे हे सर्व पक्ष सोडून गेले असले तरी प्रामाणिक कार्यकर्ता हा पक्षाच्या बाजूने आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत यांचे पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही.
मेहबुब शेख, युवक प्रांताध्यक्ष
याप्रसंगी डॉ. कमलकिशोर कदम, माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप, राष्ट्रीय सरचिटणीस नसिम सिद्दीकी, प्रभाकर देशमुख, आयोजक व जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, प्रशांत पाटील, महिला आघाडीच्या भावना घाणेेकर, प्रदेश समिती सदस्य सुरदास गोवारी, जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, दौलत शिंदे, प्रमोद बागल, ॲड.तुषार पाटील, प्रमोद यादव, माधवी जोशी, नरेश जोशी, शहाबाज पटेल, शैलेश पाटील, तुषार पाटील, सनी पाटील आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.