सा.बां. खात्याचे दुर्लक्ष; अपघाताची मालिका सुरूच
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानकडे जाणारा नेरळ-माथेरान हा सात किलोमीटरचा घाटरस्ता नागमोडी आणि अवघड वळणांचा असून, वाहनचालकांसाठी मोठ आव्हान आहे. अनेकदा रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहे. या रस्त्याला सुरक्षित कठडे अथवा लोखंडी रेलिंग बसविण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
मुंबई, पुण्यापासून जवळचे माथेरान हे पर्यटनस्थळ असल्यामुळे नेहमीच इथे पर्यटकांची गर्दी पहावयास मिळते. नेरळ ते माथेरानदरम्यान मिनिट्रेनच्या फेऱ्या कमी असल्याने अनेक पर्यटक आपली स्वतःची मोटार वाहने आणतात. नेरळ ते माथेरान हा सात किलोमीटरचा घाटरस्ता खूपच नागमोडी आणि अवघड वळणाचा असल्याने नवख्या वाहन चालकांना एकप्रकारे आव्हानच असते.
दुचाकी तसेच चारचाकी वाहने चालविताना घाटरस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे याठिकाणी अपघात घडत आहेत. त्यातच वॉटर पाईप स्टेशनखालील अरुंद वळणावर सुरक्षित कठडे अथवा लोखंडी रेलिंग नसल्याने याच ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत. सुदैवाने प्रवासी किरकोळ जखमी होत असले तरीसुद्धा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीच कार्यवाही करीत नाही, असा आरोप स्थानिकांसह वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. वॉटर पाईप स्टेशनखालील अरुंद वळणावर नेहमीच अपघात घडत असतात. चालकांना या अवघड वळणाचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात घडतात. सार्वजनिक बांधकाम खाते अजून किती अपघात होण्याची वाट पाहणार आहेत असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.