माजी आ. पंडित पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणाऱ्या जेएसडब्ल्यू कंपनीमुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. धुळीच्या कणांसह वायु प्रदुषणाचा धोका वाढला आहे. मात्र, याकडे जिल्हाधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.
दिपग्रीन योजनेंतर्गत मुंबई प्रदूषणमुक्त केली जाणार आहे. धारावीत स्वच्छता राखली जाणार आहे. स्वतः याकडे लक्ष देणार असल्याचे नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे प्रदुषण निर्माण झाले आहे, त्याप्रमाणे अलिबाग-पेण मार्गावरील वडखळमधील डोलवी येथे जेएसडब्ल्यू कंपनीमुळे परिसरात प्रदूषण होऊ लागले आहे.
या मार्गावरून प्रवास करताना प्रदूषणामुळे चालकांसह प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. धुळीचे कण नाका-तोंडात जात असल्याने श्वसनाचे आजार होण्याची भीती निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्याबरोबर फायदा करणारी कंपनी परिसरात स्वच्छता का राखत नाही, असा संतप्त सवाल पंडित पाटील यांनी उपस्थित केला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी याच रस्त्यावरून ये-जा करतात. मात्र, कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पंडित पाटील यांनी केला आहे.