| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने देश पातळीवर सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या वाहनाचे नांदगावमध्ये शुक्रवारी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोमवंशीय क्षत्रिय माळी समाज हॉलच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला नांदगावचे मंडल निरीक्षक श्री. तवर, तलाठी अरविंद देशमुख, सरपंच सेजल घुमकर, उपसरपंच मेघा मापगावकर, सर्व सदस्य तथा ग्रामसेवक प्रमोद म्हात्रे, स्मिता खेडेकर आदी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, आयुष्यमान भव:, प्रधानमंत्री उज्वला, भारतीय डाक विभागाच्या विविध योजना, राष्ट्रीय कृष्ठरोग निर्मुलन ,गरोदर स्त्रिया व नवजात बालकांसाठी जननी शिशु सुरक्षा, आधारकार्ड अपडेट अशा विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे हुर्जुके, सागरमित्र तन्मय हवालदार, अजय सरदार, सुधा गॅस वितरणचे समीर कारभारी, बचतगट ग्रामस्थ अध्यक्षा रचना कवळे, आशा वर्कर मळेकर, अंगणवाडी सेविका रावजी आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय खोत सरांनी केले. सेजल घुमकर यांनी आभार मानले.







