| मुंबई | वृत्तसंस्था |
क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. भारतीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी दि. 24 डिसेंबर मोठा निर्णय घेतला. त्यांनी नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केले आहे. खेळाडूंच्या विरोधामुळे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. कुस्ती महासंघ बरखास्त केल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. निवडणुकीनंतर अध्यक्ष झालेल्या संजय सिंह यांच्या निषेधार्थ बजरंगने पद्मश्री पुरस्कार परत केला होता. कुस्ती संघटनेच्या निलंबनानंतर बजरंगने हा सन्मान परत घेणार असल्याचे सांगितले. बजरंग पुढे म्हणाला, “आम्ही आमच्या तिरंग्यासाठी रक्त आणि घाम गाळला आहे. सैनिक आणि खेळाडूंपेक्षा कोणीही कठोर परिश्रम करत नाही. आम्हाला देशद्रोही म्हटले गेले. आम्ही कधीच देशद्रोही नव्हतो. आम्ही बक्षीस जिंकून मिळवले. आम्ही ते परत घेऊ शकतो. आम्ही सन्मान परत घेऊ. साक्षी निवृत्ती मागे घेईल की नाही याबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही’.