| पेण | प्रतिनिधी |
सध्या कोरोनाच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर केले असून आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. पनवेल तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर रायगड जिल्ह्यातील अन्य तालुक्यात नव्याने संक्रमित होणाऱ्या जेएन1 च्या चाचण्या सुरू केल्या आहेत.
पेण तालुक्यात दिवसाला सरासरी 10 च्या पटीत चाचण्या सुरू आहेत. पेणमध्ये 25 डिसेंबरला 19 चाचण्या घेण्यात आल्या. उपजिल्हा रुग्णालयात या चाचण्या सुरू आहेत. या तपासणीमध्ये गेल्या पाच दिवसात चार पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जितेमधील बळवली येथील 1 रुग्ण आहे. तर 3 रुग्ण हे पेण कुंभारआळी, समर्थ वाडी येथील एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये आई, वडील आणि मुलीचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण 4 रुग्णांमध्ये 2 पुरूष व 2 महिलांचा समावेश आहे.
उपजिल्हा रुग्णालय पेण येथे खबरदारी म्हणून 20 बेड तयार केले आहेत. तसेच, हे चारही रुग्ण आपल्या घरीच उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे. परंतु पुढील सात दिवस क्वारंटाईन राहण्याच्या सुचना वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आल्या आहेत. तरी आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.







