जय मल्हार अलिबाग संघाला उपविजेतेपद
| खारेपाट | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील बालवीर युवक मंडळ हाशिवरे यांच्यावतीने तीन दिवसीय टेनिस क्रिकेट स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रदीप स्पोर्ट्स नवखार संघ विजेता ठरला. तर, जय मल्हार स्पोर्ट्स, अलिबाग संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचे उद्घाटन हाशिवरे सरपंच शैला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्या संघास 70 हजार रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी तुलशी ट्रान्सपोर्ट मुंबई प्रो.प्रा. टी.सी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तर, उपविजेता जय मल्हार स्पोर्ट्स अलिबाग संघास 40 हजार रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी, तृतीय क्रमांक रिलायन्स नवगाव संघास 30 हजार रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी, चतुर्थ त्रिषा रांजणखार व पाचवा क्रमांक ओम साई रांजणखार संघास 20 हजार व पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.या स्पर्धेतील मालिकावीर प्रथमेश ठाकरेला आकर्षक भेटवस्तू व भव्य ट्रॉफी तन्मय आंबाडे व अंजना आंबाडे यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज मृणाल वरसोलकर, उत्कृष्ट गोलंदाज ओमकार म्हात्रे आदींना पारितोषिक देण्यात आली.
या स्पर्धेसाठी तुलसी ट्रान्सपोर्टचे मालक तुलसीदास पाटील यांनी बालविर युवक मंडळाचे सर्व खेळाडू व सभासदांना मोफत गणवेश व पारितोषिक दिली होती. या स्पर्धेमध्ये खारेपाट, अलिबाग, रायगड जिल्हा, ठाणे, मुंबई आदी संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था माजी सरपंच संध्या नंदकुमार पाटील यांनी केली होती. स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी मुख्य अतिथी तुलशी ट्रान्सपोर्टचे मालक तुलसीदास पाटील व पोलीस अधिकारी संदेश गावंड, अमित गावंड, अमित नाईक मंडळाचे अध्यक्ष शंकर पाटील, उपाध्यक्ष रमेश मोकल, बालवीर युवक मंडळाचे तसेच खारेपाटातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह हजारोंच्या संख्येने क्रीडारसिक उपस्थित होते.