| अलिबाग | प्रतिनिधी |
शासन आपल्या दारी हा कार्यक्रम माणगावमधील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रनिकेतनमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून 500 एसटी बसेसचे नियोजन केले आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशाची गैरसोय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला सुमारे 75 हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य विभाग अशा वेगवेगळ्या विभागामार्फत प्रदर्शन भरवले जाणार आहे. त्याचे नियोजन गेल्या महिन्याभरापासून सुरु होते. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता मोफत एसटी बस सेवा सुरु केली आहे. रायगडचे विभाग नियंत्रक दिपक घोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातून 500 एसटी बसेस कार्यक्रमाच्या ठिकाणी पाठविल्या जाणार आहेत. रायगडमधून 200 व पुणे, सातारा, मुंबई, रत्नागिरीमधून 300 बसेसचा समावेश आहे.
नागरिकांना कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्यापासून त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्यापर्यंत ही सेवा राहणार आहे. रायगड जिल्ह्यात सुमारे 450 हून अधिक एसटी बसेस आहेत. जिल्ह्यातून 200 बसेस पाठविल्यावर त्याचा परिणाम दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. अनेक गावांतील फेऱ्या शुक्रवारी बंद होणार आहे. त्यामुळे नियमीत एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी पाचशे बसेस पाठविल्या जाणार आहेत. रायगडमधून दोनशे गाड्यांचा समावेश आहे. शुक्रवारी प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन सुरु आहे. या कालावधीत प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
दिपक घोडे, विभाग नियंत्रक,
एसटी महामंडळ रायगड विभाग







