आक्षी येथील नेत्र तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
| अलिबाग | प्रतिनिधी |
नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील या नेते मंडळींनी तळागाळातील घटकाला उभारी देण्याचे काम आपआपल्या परीने केले आहे. शेतकरी, शिक्षक, कामगार अशा अनेक घटकाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. त्यांचा हा वारसा पुढे नेऊन गोरगरीबांसाठी काम करण्याचे ध्येय ठेवले आहे असे प्रतिपादन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले. चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत आक्षी यांच्या वतीने आक्षी साई मंदिर येथील सभागृहात नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ अलिबाग – नागांव, डॉ. वर्षा नाईक यांचे या शिबिराकरिता नेत्रचिकित्सा करण्यास मोलाचे सहकार्य लाभले. शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, आक्षीचे उपसरपंच आनंद बुरांडे, सदस्य विनायक पाटील, रश्मी वाळंज, निरजा नाईक, माजी सरपंच नंदकुमार वाळंज, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, लायन्स क्लबचे पदाधिकारी, शेकाप कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील म्हणाल्या, मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम प्रोजेक्ट दृष्टी उपक्रमातून सुरु केला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा आनंद मिळत आहे. वयाच्या चाळिशीनंतर ग्रामीण भागात डोळ्यांच्या किरकोळ आजाराकडे दुर्लक्ष केले जाते, डोळे महत्त्वाचे आहेत डोळ्यांची निगा प्रत्येकाने राखली पाहिजे. डोळ्यांच्या आजारावर वेळेवर उपचार करणेही गरजेचे आहे. तसेच चष्मा जर लागला असेल तर तो घालणं गरजेचंच आहे. आणि त्यासाठीच हा प्रोजेक्ट दृष्टी कार्यक्रम राबवला जात आहे.
चष्माचा खर्च आणि त्यात जाण्या-येण्याचा खर्चामुळे चष्मा विकत घेणे काहींना न परवडण्यासारखे आहे. प्रोजेक्ट दृष्टी या कार्यक्रमाअंतर्गत गोरगरीबांच्या डोळयांची तपासणी करून त्यांना जागेवरच मोफत चष्मा देतोय याचा आनंद होतोय. तीन लाख नागरिकांना मोफत चष्मे देण्याचा मानस आहे. आतापर्यंत वीस हजारांपेक्षा अधिक नागरिकांना चष्मे देण्यात आले आहेत. दृष्टी नावाचा हा उपक्रम हाती घेतला आहे. डोळ्यांच्या तपासणीबरोबरच शेकापच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केली जाते. ऑपरेशन करिता लायन्स क्लब, लायन्स हेल्थ फाऊंडेशन, जिल्हा सामान्य रुग्णालय अशा अनेक संस्था, संघटनांची काम मदत होते. माणुसकीचा हाच खरा धर्म असा वसा घेत सुरु केलेले सामाजिक काम चांगल्या पद्धतीने गावागावात होत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत शाळकरी मुलींना सायकली वाटप केल्या आहेत. पंचवीस हजार मुलींपर्यंत सायकलींच वाटप करून विक्रम केला. आज जर स्व. नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील, दत्ता पाटील ही नेते मंडळी असती तर त्यांना शेकापच्या या कामाचा प्रचंड अभिमान वाटला असता. कारण त्यांना ग्रामीण भागातल्या शिक्षणासाठी प्रचंड कळकळ होती. आपण आज नुसतं अलिबाग आणि मतदार संघच नाही तर महाराष्ट्रात सुध्दा सायकल वाटप केल्या आहेत. तसेच आपण नविन उपक्रम सुरू करतोय तो म्हणजे रायगड जिल्हयात आज जितकी मुलं बेंच विना खाली बसतात त्या सगळया शाळांना आपण बेंच वाटप करणार आहोत, अशी ग्वाही चित्रलेखा पाटील यांनी दिली.
शिबिराला सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात झाली. नेत्र तपासणीला आक्षीकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आक्षी मधील दोनशेहून अधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते मोफत चष्मे वितरीत करण्यात आले.





