सुवर्णसह कांस्यवेध; एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय
टोकियो | वृत्तसंस्था |
राजस्थानच्या अवनी लेखराने पॅरालिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. अवनीने 50 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकले. यापूर्वी तिने 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण जिंकले होते. ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
ऑलिम्पिकच्या आतापर्यंतच्या इतिहासात एकाच स्पर्धेत देशासाठी दोन पदक जिंकणारी अवनी पहिली भारतीय खेळाडू आहे. तिच्या या पदकासह भारताच्या खात्यात आता 12 पदके जमा झाली आहेत. याआधी देवेंद्र झाझरिया यांनी पॅरालिम्पिकमध्ये तीन पदके जिंकली आहेत, तर सुशील कुमारने ऑलिम्पिक कुस्तीमध्ये दोन आणि बॅडमिंटनमध्ये पी.व्ही. सिंधूने दोन पदके जिंकली आहेत.
प्रवीणची रौप्य उडी
पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या प्रवीण कुमारने उंच उडीत स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करीत रौप्य पदकाची कमाई केली आहे. प्रवीणने पुरुषांच्या टी -64 प्रकारात 2.07 मीटर उंच उडी मारली. या कामगिरीसह त्याने नवा आशियन विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे.