साफसफाई न झाल्याने पाणी सोडण्यास उशीर
| पेण | प्रतिनिधी |
खरीप हंगामाने आशा वाढविल्याने पेणमधील शेतकरी रब्बी हंगामाचे नियोजन करीत आहे. मात्र, आजही हेटवणे धरणापासून निघालेल्या दक्षिण कालव्याच्या साफसफाईचे काम झालेले नाही. त्यामुळे पाणी सोडण्यास उशीर होत असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे यंदा रब्बीचा हंगाम लांबवणीवर पडणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, याबाबत हेटवणे दक्षिण कालव्याचे अधिकारी श्रीकांत महामुणी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, पुण्यावरून येणाऱ्या मशिनरी न आल्याने कालव्याचे साफसफाईचे काम सुरू केलेले नाही. त्यामुळे कालव्यातून पाणी केव्हा सोडले जाईल याविषयी निश्चित सांगता येणार नाही. 2400 एकरांवर शेतीची तयारी पूर्ण झालेली आहे; परंतु धरणातून पाणी केव्हा सोडले जाईल, याविषयी अनिश्चितता आहे.
तीन किलोमीटर अंतर वाढले दक्षिण कालवा पूर्वी 19 किलोमीटरपर्यंतच कार्यान्वित होता. परंतु, आता तीन किलोमीटर अंतरावर वाढ झाली असून, 22 कि.मी.चा रब्बीचा पट्टा वाढला आहे. यामुळे 700 एकर शेतजमिनीवरचे शेतकरी भातपीक लागवड करणार असल्याचे चित्र आता दिसत आहे.
कोणती पिके घेतात? कामार्ली, आधरणे, तळवली, सापोली, बोरगाव, रोडे, काश्मिरे, शेणे, आंबेघर या ओलिताखालील गावांच्या हद्दीतील शेतकरी रब्बी हंगामात उन्हाळी भातशेती, भाजीपाला, फुलशेती व थोड्या प्रमाणात कलिंगड शेती करतो. उन्हाळी भातशेती शाश्वत उत्पन्न देणारी असल्याने यावर भर असतो. यंदा भाताला 2,183 रूपये शासकीय हमीभाव मिळाला आहे. त्यामुळे लागवडीत वाढ होणार आहे.
मशागतीची कामे अंतिम टप्प्यात टॅक्टरद्वारे उखळणी, जमिनीवरील तण काढणी, साफसफाई, भातवाफ्याची भाजणी व बांध दुरूस्ती ही कामे उरकली आहेत. डिसेंबरअखेरीस पाणी सोडले जाते. यंदा उशीर होत आहे. गेल्या वर्षी 26 डिसेंबरला धरणातून पाणी सोडले होते. मात्र, यंदा उशीर झालेला आहे.
साफसफाईची निविदा नाही
निविदा नसतानाही सुस्थितीत कालव्यावरील गवत काढण्याचे काम ठेकेदार शेखर पाटील यांनी सुरू केले आहे. परंतु, कार्यालयातून माहिती घेतली असता कार्यालय स्वतःच स्वतःच्या मशिनरी वापरून कालवा साफ करणार आहे. त्यातच यावर्षी कालवा साफ करण्यासाठी कोणतीही निविदा सूचना काढलेली नाही, असे अधिकारी श्रीकांत महामुणी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेखर पाटील नामक व्यक्तीने स्वतःच्या मनानेच 50 ते 60 मीटर सुस्थितीत असलेल्या कालव्याची साफसफाई केलेली पहायला मिळत आहे.
कांदळे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी गेली तीन वर्षे रब्बी हंगामात भातशेती लागवड करीत आहेत. भाजीपाला आणि भातशेतीचे उत्पादन घेण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. परंतु, 7 तारीख उलटून गेली तरी आतापर्यंत कालव्याला पाणी आलेले नाही. वेळेवर पाणी न आल्यास शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
मुरलीधर भोईर, सरपंच, कांदळे ग्रामपंचायत







