| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील कुणबी भवन सभागृहात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या संवाद मेळाव्यात आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने सामोरे जाऊन रायगड लोकसभेचा खासदार व श्रीवर्धन विधानसभेचा आमदार हा शिवसेना ठाकरे गटाचा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन अनंत गीते यांनी उपस्थितांना केले.
यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी प्रत्येक कामात टक्केवारी घेत असल्याचा आरोप करीत शिवसेना शिंदे गटाचे माजी उपतालुकाप्रमुख विलास ठसाळ व संजय जाधव यांच्यासह अनेकांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, संपर्क प्रमुख संजय कदम, भानंग सरपंच वंदना कदम, तालुका प्रमुख नाना दळवी, शहर प्रमुख नजीर पठाण यांसह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.