| रायगड | खास प्रतिनिधी |
शिवडी-न्हावा शेवा अटल सागरी सेतूचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. शनिवारपासून हा सागरी सेतू सर्वांसाठी खुला करण्यात आला. सकाळपासूनच या मार्गावरुन जाण्यासाठी वाहनांची गर्दी झाली होती. मुंबईसह नवी मुंबई, रायगड आणि इतर शहरांमधील अंतर केवळ 20 मिनिटांवर आले आहे.
दरम्यान, वाहनचालकांनी या सेतुवरून प्रवासाचा आनंद घेताना नियमांचे पालन करावे, वाहन वेगमर्यादा लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
या सागरी सेतूवरून चारचाकी वाहनांना ताशी 100 किलोमीटरच्या वेगाने जाता येणार आहे. तर मोटारबाईक, ऑटोरिक्षा आणि ट्रॅक्टर आदी वाहनांना या सागरी सेतूवरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतुकीला या सेतूवरुन जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी केली आहे.