कर्जतच्या आमदारांना वक्ता म्हणून डावलले
| रायगड | प्रतिनिधी |
भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीचा मेळावा मित्रपक्षांमधील समन्वयाच्या अभावामुळे फ्लॉप ठरला. मोठा गाजावाजा करून आयोजित केलेल्या या मेळाव्याकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरवलेली दिसली. मेळाव्यातील बैठक व्यवस्थेसाठी असणाऱ्या खुर्च्या कार्यकर्त्यांची वाट पाहताना दिसल्या. मेळावा समन्वयाचा होता; परंतु मोदीनामाचा जप नेत्यांच्या तोंडून ऐकावयास मिळाला. कार्यक्रमाच्या रुपरेषेमध्ये ऐनवेळी बदल केल्याने कर्जत खालापूरच्या आमदारांना भाषणापासून दूर ठेवले. यामुळे भाषणासाठी सज्ज होऊन येणाऱ्या आमदार थोरवेंना निमूटपणे खाली बसावे लागले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना अलिबागच्या स्थानिक आमदारांनी तिळगुळ देण्याचा प्रयत्न केला. थोरवेंनी तो तिळगुळ घेण्यास नकार दिला. त्यामुळे अलिबागच्या आमदारांनी जबरदस्तीने तिळगुळ त्यांच्या हातात कोंबलेला पहावयास मिळाला.
जेएसएम महाविद्यालय मैदानावर महायुतीचा समन्वय मेळावा संपन्न झाला. खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, अलिबागचे स्थानिक आमदार, आमदार रवींद्र पाटील, पनवेलचे आमदार यांसह सुरेश लाड, तिन्ही पक्षाचे जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.
सत्तेसाठी मूळ पक्षाच्या ध्येयधोरणांची प्रतारणा करीत एकत्र आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांसह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहावा, यासाठी अलिबाग येथे समन्वय मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, कार्यकर्त्यांचे मनोमिलन होण्यापूर्वीच आमदारांमध्येच मनोमिलन नसल्याचे चित्र भर मेळाव्यात व्यासपीठावर पाहायला मिळाले. कर्जत विधानसभा आमदार महेंद्र थोरवे यांना भाषण करण्यास संधी न दिल्याने त्यांनी भरसभेत नाराजी बोलून दाखवली. त्यामुळे मेळाव्याला काही प्रमाणात गालबोट लागले आहे. या मेळाव्यात खालापूरमधील सरपंच असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमा मुंढे यांना बोलण्याची संधी देण्यात आली. मात्र, थोरवेंना संधीच देण्यात आली नाही. यामुळे संतप्त थोरवे समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन होणे गरजेचे असल्याचे भाषणात म्हटले. मात्र, व्यासपीठावर उपस्थित आमदारांमध्ये मनोमिलन नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे समन्वयाची गरज ही कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांनाच असल्याचे सभेच्या ठिकाणी बोलले जात होते.
अल्पोपहार पायदळी, कचऱ्याचे साम्राज्य कार्यक्रमाला आलेल्या कार्यकर्त्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, दुपारी अडीचपर्यंत चालू असणाऱ्या रटाळ कार्यक्रमामुळे उपस्थित कार्यकर्त्यांनी काढता पाय घेत समुद्रकिनारी पर्यटन करीत आनंद लुटणे पसंत केले. त्यामुळे खाण्यासाठी दिलेले बॉक्समधील अन्न सर्वत्र पसरले होते. पाण्याच्या बाटल्यांचा खच पाहावयास मिळत होता.